राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी, यापुढे शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
मुंबई : राज्यात आता एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी झाली आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात या पुढे शिवसेनेने व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी या पुढे एकदिलाने काम करायचे ठरले आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 जुलै बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री मंत्री आदिती तटकरेउपस्थित होत्या.
अलिबाग जिल्हयात उभय पक्षात निर्माण झालेला वाद दूर करण्यासाठी ही बैठक झाली. कार्यकर्त्यांनी परस्परांवर कुरघोडी सुरु ठेवल्याने या जिल्हयात कमालीचा ताण आहे. आज भारत गोगावले, महेंद्र थोरवे महेंद्र दळवी या सेना तर पालकमंत्री आदिती तटकरे ,अनिकेत तटकरे, सुरेश लाड यांच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी समेटाची बैठक घडवून आणली. त्या त्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता कामे करावीत, असा निर्णय घेण्यात आला.
रायगड जिल्हा ही आता सेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील सत्ता समीकरणाची नांदी ठरणार आहे. अलिबाग परिसरात शेकापने सध्या राष्ट्रवादीसोबत रहायचे ठरवले होते पण नव्या सत्ता समीकरणात दोघांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात काटे की टक्कर झाली होती. ही स्पर्धा संपवून आता साहचर्याचे युग निर्माण करायचे ठरले आहे. हा प्रयोग यापुढे महाराष्ट्रात सर्वत्र राबवला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परस्परांच्या जवळ आले असून ही युती राज्याचे नवे भवितव्य ठरू शकेल.


