मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांना वाढीव वीजबिलातून दिलासा मिळावा यासाठी आता विरोधक राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून सोमवारी राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना आवाहन करत या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यास सांगितले आहे.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना अवाजवी वीजबिले आली. त्यानंतर सरकारने याबाबत दिलासा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या ऊर्जामत्र्यांनीच वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. याच पार्श्वभूमीवर, या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपकडून राज्यव्यापी वीजबिल होळीचे आंदोलन करण्यात येणार आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.
चंद्रकांत पाटील पुढे असेही म्हणाले की, “कोरोना काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आधीच नागरिकांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातही अजून वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आवाजवी वीजबिले आली आहेत. मात्र, सरकार याबाबत लोकांना दिलासा तयार नाही. म्हणूनच भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे कार्यकर्ते सोमवारी ठिकठिकाणी वीजबिलांची होळी करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील”
