रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले. शिवाय दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असतानाच वाशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. जगबुडी नदीने आज सकाळी ९.३० वाजता ७.१० मीटरची पातळी गाठून इशारा पातळीही ओलांडल्याने खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आली. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.