मुंब्र्यातील ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था नाजूक
महाड-रायगडच्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर खुद्द सरकारने जुन्या सर्व पुलांच्या दुरुस्तीचे अथवा ते पुल बंद करावेत असे आदेश दिले. असाच एक ब्रिटिश कालीन पुल मुंब्र्यातील पारसिक बोगद्या जवळ आहे व हा पुल कधी ही ढासळण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वाटू लागले आहे.

पुलाच्या या अशा दूरावस्थेची कल्पना स्थानिक नगरसेवक राजन किणे यांनी रेल्वे प्रशासनास पत्राद्वारे सांगितली असून या पुलाच्या रुंदीकरणाची मागणी देखील या पत्रातून त्यांनी केली आहे. नागरिकांना स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे या पुलावर नेहमीच गाडयांची व नागरिकांची लगबग सुरु असते. तरी देखील प्रशासनाकडून अद्यापही काही हालचाल झालेली दिसून आलेली नाही. हा पुल कोसळून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असाच प्रश्न येथील नागरिकांना आहे.
मुंब्र्यातील हा पुल ब्रिटिशकालीन असून या पुलाच्या खालुन ठाणे-कल्याण जलद रेल्वेचा महत्वाचा मार्ग आहे. पुलाची वारंवार डागडुगी करण्यात आली. परंतु तरी ही या पुलाची अवस्था नाजुक असून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
