Monsoonमुंबईशहर

डोंगरीत इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु

मुंबई: डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ रहिवासी ठार झाले असून या इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डोंगरीच्या तांडेल स्ट्रीटवरील अब्दूल हमीद दर्गा येथील केसरबाई इमारत कोसळली. ही इमारत चार मजली असून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. संपूर्ण चार मजली इमारत कोसळल्याने १२ जण ठार झाले असून इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. इमारत कोसळल्याने या भागात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. अग्निशमन दल आणि पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी रवाना झालं आहे.

मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू करण्यात आलं असून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अत्यंत चिंचोळ्या भागात ही इमारत असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, ही इमारत म्हाडाची असून ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button