लॉकडाऊनच्या काळात शेतकरी कंपन्यांची ५० कोटींची उलाढाल
मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या दरम्यान सर्व व्यवहार ठप्प झाले असले तरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला मात्र परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करीत राज्यातील शेतकऱ्यांना काही अंशी त्याचा फायदा झाला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (एफपीसी) बंद काळामध्ये तब्बल ३ हजार २२० गृहनिर्माण संस्थांना पाच हजार टनांहून अधिक भाजीपाला, धान्य आणि फळांचा पुरवठा केला. शेतकरी कंपन्यांची या काळात ५० कोटी रुपयांची उलाढाल झाली.
मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाले होते. पुणे-मुंबईसह महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत्यांनीदेखील काही दिवस बंद ठेवला होता. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने शेतमालाच्या वाहतुकीवर काहीशी मर्यादा आली होती.
या काळात महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट परिषद लिमिटेडच्या (एमसीडीसी) माध्यमातून राज्यातील ५२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतील तीन हजारांहून अधिक सोसायट्यांना भाजीपाला, फळे आणि धान्याचा पुरवठा केला.
गृहसंस्थांमधील तब्बल ३ लाख १० हजार नागरिकांना गहू, बाजरी, उडीद डाळ, तांदूळ, भाजीपाला, फळभाज्या आणि मागणीनुसार हंगामी फळांचा पुरवठा केला. गृहसंस्थांकडून भाजीपाल्याची ऑनलाईन मागणी नोंदविण्यात आली. त्याप्रमाणे संस्थेच्या आवारामध्ये भाजीपाला आणि धान्याचा पुरवठा करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग, वैयक्तिक स्वच्छता आणि पुरवठादारांच्या आरोग्य तपासणीचे निकष पाळण्यात आले.


