पवारांकडून कान टोचणी आणि मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात वृत्त
मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे लॉकडाऊनच्या पहिले तीन महीने सामान्य नागरिक ते मंत्री राजकीय नेते सर्वांनीच लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले. मात्र, तीन महिन्याच्या बंदीवासानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली व लोक, नेते घराबाहेर पडायला सुरूवात झाली. मात्र, यादरम्यान विधानपरिषदेची निवणूक, निसर्ग वादळानंतरचा कोंकण दौरा सोडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईबाहेर पडल्याचे दिसत नाही.
याउलट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस असो वा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सर्व नेते लोकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, कोरोनाची स्थिती, रुग्णालयांची अवस्था या सर्वांची पाहणी करताना दिसले.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका होत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, महाविकास आघाडीचे सुप्रिमो शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडायला पाहीजे अशा शब्दांत त्यांचे कान टोचले त्यानंतर आता मुख्यमंत्री मुंबईतून बाहेर पडून पहिली भेट ते उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा पुणेला भेट देणार आहेत असे समजते.
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे. मुंबईत असूनही शेजारी जिल्हा पुण्यात न आल्याने उद्धव ठाकरेंविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन होताना दिसत आहे.
दुसरे असे की, मुंबईतील कोरोनाची स्थिती आता आटोक्यात येताना दिसत आहे. मुंबईत आता रुग्णवाढीचे प्रमाण कमी होण्याकडे कल आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मिशन पुणे हाती घेतल्याचे दिसते. यासाठी त्यांनी धारावीला कोरोनाच्या स्थितीतून सावरण्यासाठी अहोरात्र काम केलेले मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांना आता पुण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे चहल यांनी पुण्यात काम सुरू केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री ठाकरे पुणे दौ-यावर जातील असे सांगण्यात येत आहे.
पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन नीट होत आहे, मग अंमलबजावणी होताना काही अडचणी आहेत का? कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखणे आणि मृत्यूदर कमी करणे यावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रित करु शकतात. पुण्याला निधी अपुरा पडत आहे का, याविषयीही ते विचारणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कालच्या बैठकीत, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

