काहीही झाले की केंद्र सरकार विरोधात बोलायचे; राज्यातील मंत्र्यांनी बंद करावे – फडणवीस
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सतत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करतात, हे बंद करा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम महाराष्ट्र सरकारला देऊ केली आहे. उल्लेखनीय म्हणजे सर्वाधिक परतावा महाराष्ट्राला दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले व राज्य सरकारच्या मंत्र्यांना, आतातरी केंद्राकडे बोट दाखवणे बंद करा असा टोमणा मारला.
जीएसटीचा परतावा किंवा केंद्राकडून येणारा निधी, मिळणारी मदत यावरुन राज्यातील मंत्री केंद्र सरकारवर सतत टीका करतत्. अनेक दिवसांपासून जीएसटी परतावा देण्यावरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाला होता. केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी विरोधी पक्ष भाजपाची कोंडी करत होते. मात्र आता केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाला आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक १९ हजार २३३ कोटी रक्कम मिळाली आहे, त्यानंतर कर्नाटक १८ हजार ६२८ कोटी रुपये जीएसटी परतावा म्हणून मिळाले आहेत.
केंद्र सरकारने स्वत:कडील ७५ हजार कोटी रुपये जीएसटी परताव्यासाठी सर्व राज्यांना दिले. त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्राला जीएसटी परतावा देण्यात आला त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि केंद्र सरकारचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणालेत. केंद्र सरकारवर आरोप लावणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनीही केंद्र सरकारचे आभार मानावेत. कारण, पीएम केअरमधूनही सर्वाधिक मदत महाराष्ट्राला झाली आहे. त्यामुळे, काहीही झाले की उठायचे अन् केंद्र सरकारविरोधात बोलायचे बंद करा, असे फडणवीस यांनी राज्याच्या मंत्र्यांना सुनावले.
₹19,233 crore !
Maharashtra got the highest share in GST compensation.
Thank you Hon PM @narendramodi ji !
महाराष्ट्राला सर्वाधिक जीएसटी कम्पेन्सेशन !
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार ! pic.twitter.com/hGHthIAwBe— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी करत होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता.


