Festival (फेस्टिव्हल)Maharashtra Govमुंबई

बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत, कोरोनाविरुद्धचा मुकाबला जोरात सुरू

मुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने , जमल्यास प्रतीकात्मक आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. बकरी ईदसंदर्भात आज आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनीदेखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

या वर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईदनिमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको. महाराष्ट्रातील सर्व जनतेने जातपात, धर्म, पंथ न मानता कोरोना विरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी आभार मानले. ते म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले.

बकरी ईदमध्येदेखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरी करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गृहमंत्री देशमुख म्हणाले की, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यांत जे सण उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईदनिमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावी. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल.

कंटेनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस. चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button