पंजाब मधील लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे १६५ विद्यार्थी घरी परतले
विद्यार्थ्यांनी फिजिकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध राज्यात नागरिक अडकले आहे. राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यातील प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील नागरिकांना आपण राज्यात परत आणत आहोत. त्यामुळे आज पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरी परतल्यावर प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करत आपण कोरोना विरुद्ध लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनमध्ये पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील 165 विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना खासदार शरदचंद्रजी पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुप्रिया सुळे, धिरज शर्मा, रविकांत वरपे यांच्या मदतीने पंजाब वरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे 4 मे 2020 रोजी 120 विद्यार्थी आणण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील सहा बसेसच्या माध्यमातून पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुखरूप पाठविण्यात आले.
यामध्ये नागपूर-वर्धा-अकोला-बुलढाणा 16, औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर 16, पुणे-22, मुंबई-ठाणे-पालघर-रायगड 15, अहमदनगर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर 24, सातारा-सांगली-कोल्हापूर -रत्नागिरी 15 विद्यार्थी या सहा बसेसच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. या सर्व बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व बसेसचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच नाशिक आणि धुळ्यातील 12 विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचविण्यात आले आहे.

त्याचबरोबर उद्या रात्री 45 विद्यार्थी दोन बसेसच्या माध्यमातून मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे पोहोचणार असून त्यांना मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या बसेसद्वारे त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यात येणार आहे. काल आलेल्या 120 विद्यार्थ्यांना रात्री उशिरा मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी अल्पोपहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना सहा बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की, आजवर ज्या गोष्टींना कधी सामोरे जाण्याची वेळ आली नाही. ती वेळ आज आपल्यावर आली असून या महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतू या संकटावर एकमेकांच्या मदतीने आपण मात करू शकतो. आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांची उत्तम व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून केली. त्याबद्दल आभार देखील मानले.
