ज्येष्ठ नागरिकांसाठी १ मार्च पासून मोफत कोरोना लस !
मुंबई: काहीच दिवसांपूर्वी कोरोना लसी करणाचा तिसरा टप्पा हा १ मार्च पासून चालू होणार अशी बातमी आली होती. याचेच पुष्टीकरण बुधवारी केंद्र सरकारने केले. देशात १ मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार अशी घोषणा केंद्र सरकारने केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदमध्ये ही माहिती दिली. प्रकाश जावडेकर यांनी असे वक्तव्य केले की १ मार्च पासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणारे ज्यांचे वय ४५ हुन अधिक आहे अशा नागरिकांचे लसीकरण केले जाईल.
माहितीनुसार असे कळते की, १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रावर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच ते याबाबतीत पुढेही बोलले की ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसात घेईल . आरोग्य मंत्रालय यावेळी त्याबाबत अजूनही विचार करत आहे आणि त्यांची चर्चा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चालू आहे.
कोरोना बाधितांची संख्या ज्या राज्यांमध्ये वाढत आहे त्या राज्यांत केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथके पाठवण्यात येत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर या राज्यांत आतापर्यंत पथके पाठवण्यात आली आहे.
