राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात; सदाभाऊ खोत यांची टीका
मुंबई : माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील राजकीय वैर फार जुने आहे. या पार्श्वभूमीवर खोत यांनी शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे.आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली.
आमच्यासारख्या माणसांमुळेच तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय? मला तुमच्यासारखे सरड्यासारखे रंग बदलता येत नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला. सांगलीमधील इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीत राहायचं असल्यानं माझं नाव घेत असतात. पण मला त्या भंपक माणसाविषयी जास्त बोलण्याची इच्छा नाही. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा. २०२४ मध्ये आमने-सामने आल्यानंतर सदाभाऊच्या विषयावर बोलता येईल, असेही ते म्हणाले .
इतकेच नाही तर “करोना संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. निकृष्ट बियाणं, दूधदर यावरून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यायला हवे.” असा सल्लाही खोत यांनी शेट्टींना दिला आहे .
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी आंदोलने करण्यात येत आहे. आता दूधदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीवर धडक मोर्चा काढण्यात येत आहे.

