‘नया है वह’ म्हणत फडणवीस यांचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. ‘नया है वह’ म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले .
“खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येते. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना! ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर प्रतिक्रियाही देऊ नये.” असे फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील मंडळी सरकारवर टीका करत राज्यभर फिरत आहेत.
ते सध्या आपत्ती पर्यटनात (डिझॅस्टर टुरिझम) व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असेही ते म्हणाले होते.


