Maharashtra Govशिक्षण

दुष्काळी भागातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष शेलार

दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा फी नाही तर प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती आरटीजीएस (RTGS) मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याबाबत शालेय शिक्षण मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी माहिती घेतली.


राज्य शासनाने घेतलेले निर्णय

विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती माफ करण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या रकमेत प्रात्यक्षिक शुल्क, गुणवत्ता प्रमाणपत्र शुल्क इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे महसूल मंडळ, गाव, तालुका व जिल्ह्याची तसेच विद्यार्थी, पालकांच्या बँक खात्याची माहिती राज्य मंडळ घेणार आहे. महसूल विभागांना दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळ घेणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर महसूल विभागातर्फे जी गावे दुष्काळी म्हणून जाहीर होतील अशा गावातील विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शासन निर्णयानंतर मंडळाच्या संगणक प्रणाली मधून शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना मंडळामार्फत देण्यात येणार आहे.

शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेल्या परीक्षा फीच्या रकमेची संपूर्ण प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांच्या/पालकांच्या बँक खात्यात RTGS द्वारे जमा करावी याकरिता आवश्यक सर्व व्यवस्था, ऑनलाईन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दुष्काळग्रस्त भागातील असल्याने राज्य मंडळातर्फे परीक्षा शुल्क आकारण्यात आले नाही त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्ती रकमेचा प्रस्ताव राज्य मंडळाने शिक्षण संचालकांस नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावा जेणेकरून ३१ मार्च पर्यंतची प्रतिपूर्तीची रक्कम राज्यमंडळास अदा करणे शक्य होणार आहे. दुष्काळी भागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत ही योजना सेल्फ फायनान्स वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / अनुदानित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहणार असून याकरिता विशेष कक्ष शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे स्थापन करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button