आता तरी राज्यातील चाचण्या वाढवा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिेंता वाढवत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. अशी तक्रार वारंवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि ५ महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.
“चाचण्या वाढविण्यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करत असतानाही पाहिजे त्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी संसर्ग कमी होणे सोडून तो अधिकाधिक वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आतापर्यंतच्या ६ महिन्यांतील सर्वाधिक संसर्गाचा दर महाराष्ट्रात आढळून आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात चाचण्यांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढविल्यानंतर ती आणखी वाढविण्याची गरज होती. पण, सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत केवळ २६ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. जुलैमध्ये प्रतिदिन ३७,५२८, ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४,८०१ तर सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ८८,२०९ चाचण्या करण्यात आल्या. केंद्र सरकारकडून सुद्धा चाचण्या वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांसोबतच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आपण चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढविण्याचा विचार बोलून दाखविला. तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र दिवसागणिक चाचण्या कमी होत असल्याचे दिसून येते”, असं देवेंद्र फडणवीसांनी या पत्रात म्हटले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र पुन्हा कार्यरत करायचे असेल तर मुंबईसारख्या लोकसंख्येतील चाचण्यांचे प्रमाण कितीतरी अधिक असायला हवे. पण, सप्टेंबर महिन्यात दररोज सरासरी केवळ ११,७१५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिणाम काय झाला? ऑगस्टमध्ये मुंबईचा संसर्ग दर जो १३.६३ टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये पुन्हा १७.५० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. याचाच अर्थ ४ टक्क्यांनी संसर्ग दर वाढला आहे. जुलै महिन्यात सुद्धा असाच १७.९७ टक्के संसर्ग दर होता.