औरंगाबाद: भाजपकडून आघाडी सरकारला वारंवार टार्गेट तर केले जात आहेच. पण कॉंग्रेसवर वारंवार टीका भाजपकडून केली जात आहेच. “काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही हे पूर्ण सत्य आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पायपीट करावी लागते. काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडीनेही झिडकारलं”, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्ताने शेलार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणालेत “वीजबिलाचा मुद्दा हा आमचा आहे. आमच्या मुद्द्यावर मनसे आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीने लबाडी केली. याला जनता कधीच माफ करणार नाही. वीजबिलात आधी सवलत देऊ म्हणणाऱ्या नेत्यांना पक्षातील नेत्यांनीच किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांना हे विधान करावं लागतं. आम्ही चेतावणी देऊ, झोपडीत राहणाऱ्याला जास्त बिल कसं येतं? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, आम्ही पाठ सोडणार नाही”, असा घणाघात शेलार यांनी केला आहे.
“तुमच्या झेंड्याची शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावकरांची बदनामी करणाऱ्या पक्षासोबत ते गेले. त्यांनी आता शुद्धीकरण केलं पाहिजे”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. त्याचबरोबर “आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचा भगवा झेंडा फडकेल. विकासाच्या वाटेवर जाणं अपेक्षित आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
