राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरून पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी?
मुंबई : राजपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी येत्या काही दिवसात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने नियुक्त्यांबाबत कोणताही प्रस्ताव. न पाठवण्याच्या सूचना राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला दिल्या होत्या. पण आता १२ आमदारांची नियुक्ती तातडीने व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांच्याकडे आग्रह धरण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे.
आता पुन्हा महाविकास आघाडी १२ राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी पत्रव्यवहार आणि वेळ पडली तर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. विधीमंडळातल्या १२ जागा या महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळ वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल या नियुक्त्यांबाबत राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सतत होत आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांसाठी सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा सध्या जागावाटपचा फॉर्म्युला ठरलेला नाही. शिवसेना आणि काँग्रेसकडून ५ जागांची मागणी होत आहे. कारण शिवसेनेनं राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणुकीत आपली मतं दिली होती. त्यामुळे शिवसेना ५ जागांसाठी आग्रही आहे. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद जागांसाठी काँग्रेसला २ जागांचा आग्रह असताना एका जागेवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी काँग्रेसनं पाच जागांचा आग्रह धरला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं तीनही पक्षांना समसमान वाटप व्हावं ही भूमिका घेतली आहे.

