देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौर्याचा आज दुसरा दिवस आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
आपण नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की सगळ्यांचे सर्वोच्च हित म्हणजेच देशाचे हित आहे. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करतो, केवळ तेव्हाच आपण प्रगती करू शकतो. मी अशा राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी, आमच्या सुरक्षा दलाच्या मनोबलासाठी कृपया असे राजकारण करू नका आणि अशा गोष्टी टाळा. आपल्या स्वार्थासाठी आपण जाणूनबुजून किंवा नकळत देशविरोधी शक्तींच्या हातात हात खालून देशाशी खेळू नका, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
यापूर्वी शेजारच्या देशातून आलेल्या बातम्या, तेथील संसदेत ज्या पद्धतीने सत्य स्वीकारले गेले आहे, त्याद्वारे या लोकांचे खरे चेहरे देशासमोर आले आहेत. हे लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचे पुलवामा हल्ल्यानंतर केलेले राजकारण हे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेसचे नव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे विरोधकांनी दाखवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेले राजकारण याचे मोठे उदाहरण आहे. तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची विधाने केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही.
आज येथे निमलष्करी दलाचे संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. या हल्ल्यात आपल्या वीर जवानांना होतात्म्य आले. मात्र, त्यावेळी संपूर्ण देश दुःखात असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते. ते पुलवामा हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. हे देश कधीही विसरणार नाही. त्यावेळी केलेली वक्तव्ये आणि राजकारण देश कधीच विसरू शकत नाही. देशावर एवढा मोठा घाव झालेला असताना, काही लोकांना यात राजकारण दिसत होते. अशा पक्षाच्या नेत्यांवर बरसताना मोदी म्हणाले, ते व्हा ते सर्व आरोप झेलत होते, अनेक वाईट गोष्टी एकत राहिले. माझ्या मनावर वीर जवानाच्या हौतात्म्याचा घाव होता. मात्र, काही दिवसांपूर्वी शेजारील देशांतून ज्या बातम्या आल्या, तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारले गेले, त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आला आहे.
मी अशा काही राजकीय पक्षांना विनंती करतो, की देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करून, अशा प्रकारचे राजकारण करू नका. आपल्या स्वार्थासाठी आपण नकळत देशविरोधी शक्तींचा हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करू शकाल, ना आपल्या पक्षाचे, असेही मोदी म्हणाले.
महर्षी वाल्मिकी यांनी आज भारताचे सांस्कृतिक ऐक्य, आपण अनुभवत असलेला भारत आणि ते सजीव व ऊर्जावान बनवण्याचे कार्य केले आहे. आजचा भारत आपल्या सार्वभौमत्वाच्या आणि सन्मानाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आणि सज्ज आहे. भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. आजच्या भारताचा दृष्टिकोन बदलला आहे, सीमेकडे पाहणा-यांना योग्य उत्तर दिले जात असल्याचंही मोदींनी अधोरेखित केले आहे.
प्रतिकूल परिस्थितीत आम्ही मोठी कामे केली. कलम ३७० हटवले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांनी दिलेल्या ऐक्याच्या संदेशामुळे आम्हाला कोरोनासारख्या संकटाशी ८ महिने लढण्याचे सामर्थ्य मिळाले. कोरोना व्हायरस सन्मान करण्यासाठी लोकांनी दिवे लावले. कोरोना महामारीचा सामना करताना या देशातील जनतेने त्यांची इच्छाशक्ती अभूतपूर्व असल्याचे दर्शविले आहे.
