मुंबई: सध्या राज्यात अनेक विषयांवरून राजकरण सुरु आहे. त्यातील एक विषय म्हणजे मुंबई लोकल. यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे. मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. यामध्ये कोणतंही राजकारण आणलं जाऊ नये असंही त्यांनी खडसावलं आहे. अनिल देशमुखांनी यावेळी राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला वेळापत्रक सुचवलं असल्याचंही सांगितलं आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या ७ महिन्यांपासून बंद असलेली लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसंच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. दरम्यान राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी दर्शवली असून यासंबंधी विनंती करणारं पत्र रेल्वेला पाठवलं आहे. राज्य सरकारने प्रवासासाठी वेळापत्रक तयार केलं असून तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आलं आहे.
त्यानंतर रेल्वेकडून मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये असमर्थता दर्शवण्यात आली असून अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे. “जर रेल्वेने सहकार्य केलं तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यामुळेच कोणतंही राजकारण न करता रेल्वेने सहकार्य करावं,” असं ते म्हणाले आहेत.

