अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या – राजू शेट्टी
कोल्हापूर : दूध दरवाढीसाठी राज्यभरात कालपासून आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. आंदोलन करताना अनेकांनी दूधाचा वापर करून कुठे अभिषेक तर कुठे थेट मुख्यमंत्र्यांनाच दुधात ठेवणे. एवढेच नाही तर आज सकाळी चक्क आंदोलनकर्त्यांनी दूधाचा टॅंकर फोडला व दूध पाण्यासारखे रस्त्यावर वाहू लागले.
या आंदोलनाविषयी बोलताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतक्रिया देताना अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या असे भावनिक विधान केले आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर 20 रुपये मिळतात. मात्र, दुधाला 17-18 रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. कर्जबाजारी होऊन मरण येणार असेल, तर सोशल डिस्टन्सिंग कशाला?” असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
“पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव दिला जातोय. आमच्या आया-बहिणी राबराब राबतात. शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर मिळतोय. मग आंदोलकांनी दूध ओतलं तर त्याला नासाडी का म्हणायचं? हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी पवित्र मनाने आंदोलन हाती घेतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
तसेच, शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे त्यांनी घातले . रस्त्यावर दूध ओतताना शेतकऱ्यांना होणारा त्रास समजून घ्या, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केले. ते टीव्ही9 सोबत बोलत होते.