Politicsराजकारण

दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच! आशिष शेलार यांची सेनेवर टीका

मुंबई : शेतकरी कायद्याविरोधात उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर जनतेनं बंद पाळण्याचंही आवाहन केलं आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या भूमिकेवरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून देत शिवसेनेवर टीकेचा बाण डागला आहे. “आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!,” असा उपहासात्मक टोलाही शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

भारत बंदला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला. शेलार म्हणाले,”दिल्लीत लोकसभेत शिवसेनेचा सीएए आणि कृषी विधेयकाला पाठिंबा आणि राज्यसभेत विरोध… महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामार्गाला विरोध आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु… मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका… दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच!,” अशी टीका शेलार यांनी केली.

“हिंदुत्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी… आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!,” असा सल्लाही शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

“नुकतीच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली करोना काळात आंदोलने आवरा! आता भारत बंदमध्ये जनतेने सहभागी व्हावे,असे तुम्हीच सांगताय? अन्नदात्याला सगळ्यांचीच सदैव सहानुभूती आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या नावाने दल-बदलू राजकारण करणाऱ्यांनाच खरी “कर्माची फळे” भोगावी लागतील!,” असा सूचक इशारा शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button