राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा!
मुंबई : राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, त्यामुळेच राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने यापूर्वीच अशाप्रकारे अवकाळी पाऊस राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचा इशारा दिला होता. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याचे वृत्त आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.
आयएमडीने पुढील 24 तास ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आभाळ “खालच्या पातळीवरील इस्टरलीचा कुंड आता उत्तर केरळ किनारपट्टीपासून चक्रवाती अभिसरण दक्षिण कर्नाटकच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुरू आहे. यामुळे क्लाऊड डेव्हलपमेंट आणि आर्द्रता निर्माण झाली, ”असे मुंबईचे आयएमडी वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी सांगितले.
सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून उद्याही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्कायमेट या खासगी हवामानशाळेचे उपाध्यक्ष महेश पळवट यांनी यासंदर्भातील ट्विट केलं आहे.