मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. असं असलं तरी विरोधकांकडून मात्र सरकारवर टीकेचा बाण सोडला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राज्य सरकारवर जोरदार हल्लोबोल केला होता. त्यानंतर आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनीदेखील सरकारचं अभिनंदन करत टीकेचा बाण सोडला आहे. “वर्षभरातील सरकारचं काम पाहता अभिनंदन करावं अशी परिस्थिती नाही. तरीही ती महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही. ठोस निर्णय नाही. शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. या मुलाखतीवरुन भाजपानं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
शेलार म्हणाले की, शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्या बाबतीत संभ्रम. कापूस, धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुद्धा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले अभिनंदन आणि कसल्या मुलाखती!
“आपल्या तीन पायाच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोठ्या जाहिराती, मुलाखती झळकल्या त्या महाराष्ट्रातीस शेतकरी, कष्टकरी, कामगार, श्रमिक, नागरिक सगळ्यांनी त्या वाचल्या असतील. शेतकरी, सरकारच्या धरसोडपणामुळे शेक्षणिक वर्षाचे नुकसान करून बसलेले विद्यार्थी असो किंवा उपासमारीची कुऱ्हाड कोसलेला कामगार, श्रमिक, मजूर, गणेशमूर्तीकार असो. प्रत्येकाला सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका बसला. मराठा समाजाचे नुकसान झाले तर पगार मिळत नाही म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काळाचे तुकडे करणारी आहे,” असंही शेलार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
“तिघाडी सरकारला ना कसले सोयर ना कसले सुतक. आपले मंत्री रोज सकाळी उठतात केंद्राच्या नावानं शिमगा करतात. आपले सरकार पाहिले की राज्यातील जनतेला आता हसावे की रडावे हे कळत नाही. परंतु सरकार रोज शांतपणे झोपतं आणि सकाळी उठून तोंड वाजवत बसतं. करोनानं कुटुंबातील सदस्य गेले त्यांचे उजाड चेहरे डोळ्यासमोर आल्यावर कोणीही अस्वस्थ होईल असं चित्र आहे. पण आपल्याला झोप लागते कशी,” असा सवालही त्यांनी पत्राद्वारे केला आहे. “आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान आणि विरोधकांवर टीका करण्याव्यतिरिक्त आपला महाराष्ट्रातील कार्यक्रम काय आणि कोणता? खोट्या अस्मितेची ढाल करून त्यामागे किती दिवस लपणार? माझे कुटुंब टार्गेट केले जातेय असे फसवे चित्र रंगवून किती दिवस जनतेची फसवणूक करणार,?” असे सवालही शेलार यांनी केले आहे.
“पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते आणि पेला अर्धा सरला आहे, असेही म्हणता येते!” पण पेला रिकामाच असेल आणि तो भरला आहे असे आभासी, खोटे, फसवे चित्र राज्य सरकार निर्माण करीत असेल, तर महाराष्ट्रातील जनता सरकारचे कसे बरं अभिनंदन करु शकेल,” असंही ते म्हणाले
कोरोनावरून विरोधकांकडून तुमच्यावर टीका होतेय सातत्याने, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, ते टीका करत असतील तर त्याला मी काय करू. ठीक आहे. हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. डोक्यावरील उपचारांची प्रक्रिया सुरू आहे. डोक्यावर उपचार म्हणजे फक्त चंपी मालिश नाही करणार. ही पातळी आहे का मुख्यमंत्र्यांची असा सवालही केला जात आहे.
