Health & Fitness

‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी कोल्हापूरची निवड

कोल्हापूर :  कोरोनावरील कोव्हॅक्सिन या लस चाचणीचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या आणि देशातील सर्वात मोठ्या टप्प्यालाही प्रारंभ झाला आहे. या टप्प्यामध्ये देशभरातील 25 हजार 500 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्या चाचणीसाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची निवड केली आहे. या चाचणीमध्ये कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या चाचणीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती ‘क्रोम’ने दिली. या राष्ट्रीय अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 7775026777 या मोबाईल क्रमांकावर आधार कार्ड व व्हॉटस्अॅप मेसेज करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधितांना दूरध्वनी करून त्यांची चाचणीसाठी आवश्यक माहिती घेण्यात येईल. तसेच लस कोणत्या दिवशी द्यायची त्यादिवशी त्यांच्या रक्ताचा नमुना व स्वॅब घेऊन लसीचा पहिला डोसही देण्यात येईल. अशा व्यक्तींचा जर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर शास्त्रीयदृष्ट्या त्यांना 28 दिवसानंतर दुसरा बूस्टर डोस देण्याची गरज नसल्यामुळे तो देण्यात येणार नाही. पण ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना मात्र 28 व्या दिवशी दुसरा डोस देऊन त्यांचे निरीक्षण केले जाणार आहे.
संबंधित चाचण्यांच्या कालावधीत स्वयंसेवकांचा विमा प्रकल्पांतर्गत उतरविण्यात आला आहे. स्वयंसेवकाच्या कोणतीही वैद्यकीय अडचण आली तर त्याचा संपूर्ण उपचाराचा खर्च प्रकल्पामार्फत केला जाणार आहे.

गोव्यात क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम या संस्थेच्या साईटवर एकूण एक हजार स्वयंसेवकांना लस चाचणीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यापैकी 250 स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. स्वयंसेवकांना लस देताना त्यांचा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर यंत्राद्वारे तपासण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया यामध्ये अंतर्भूत आहे. हा स्वॅब तपासण्याकरिता प्रारंभी गोवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेथे असलेल्या क्लोज्ड एंड स्वरूपाच्या यंत्रामध्ये इतर दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे किटस् चालत नाहीत आणि ‘कोव्हॅक्सिन’च्या चाचणीमध्ये ‘आयसीएमआर’ने विकसित केलेले किटस्च वापरणे आवश्यक होते. याप्रसंगी ‘आयसीएमआर’कडे निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हैदराबाद व राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था, पुणे हे दोन पर्याय उपलब्ध होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button