पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा बचत ही काळाची गरज : ना बाळासाहेब थोरात
पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा बचत ही काळाची गरज : ना बाळासाहेब थोरात
माहितीपटाचे ना. थोरात यांच्या हस्ते विमोचन
महाऊर्जाचा ऊर्जासंवर्धन सप्ताह
नागपूर, 20 डिसेंबर – ऊर्जा संवर्धन ही आज काळाची गरज असून ऊर्जा संवर्धन केल्याशिवाय भविष्यातील पिढीचे जीवन प्रकाशमय होणार नाही, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले. ऊर्जा बचत आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन ऊर्जा संवर्धन करण्यासाठी समाजातील लहान थोरांपासून सर्वांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून महाऊर्जातर्फे खास तयार करण्यात आलेल्या माहितीपटाच्या सीडीचे विमोचन राज्याचे ऊर्जा मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
रवीभवन कॉटेज क्रमांक 5 येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाऊर्जाचे महासंचालक कांतिलाल उमाप, अप्पर महासंचालक सुरज वाघमारे, ऊर्जा संवर्धन विभागाचे महाव्यवस्थापक स्मिता कुदरीकर, प्रादेशिक संचालक सारंग महाजन, महाऊर्जाचे उपसंचालक लेखा सुरेश शहापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या माहितीपटाच्या सीडीचे विमोचन झाल्यानंतर उपस्थितांना हा माहितीपट दाखविण्यात आला. ऊर्जा संवर्धन म्हणजेच ऊर्जा निर्मिती हा जनहितार्थ मौलिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवणारा हा माहितीपट उत्कृष्ट, प्रबोधनपर आणि वीज बचतीचे महत्त्व पटवून देणारा आहे.
राज्यातील शाळा-शाळांमध्ये हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात येऊन ऊर्जा बचतीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात विजेचा कमीत कमी वापर करून आपल्या गरज कशा भागवाव्यात याची नेमकी माहितीही हा माहितीपट देतो. टीव्हीसमोर कुणीही नसताना टीव्ही सुरु ठेवू नये. घरातील बैठकीत 4 ते 5 विजेचे दिवे असतात. ते सर्वच्या सर्व दिवे अकारण सुरु ठेवू नयेत. आवश्यकतेनुसार एकच दिवा सुरु ठेवावा. दिवसा खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश येईल यासाठ़ी दारे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे दिवसा दिवे लावण्याची आवश्यकता भासणार नाही. इस्री, फ्रीज, पंखे, वातानुकुलित यंत्रणा, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन यासारखी घरगुती वापरातील उपकरणे आवश्यक तेवढीच व सुयोग्य पध्दतीने वापरून आपण सर्व जण ऊर्जेची बचत करण्याचे महत्त्वाचे सामाजिक व निसर्गपूरक कार्य करू शकतो, हे या माहितीपटाच्या माध्यमातून प्रतिबिंबित करण्यात आले आहे.


वीज बचत नव्या पिढीसाठी नवजीवन देणारे व उज्वल प्रकाश देणारे आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत आवश्यकतेनुसार व काटेकोरपणे विजेचा वापर ठेवण्याची दक्षता घ्यावी. हा संदेशही या माहितीपटातून देण्यात आलेला आहे. कार्यालयांमध्ये असलेल्या विविध कॅबिनमधील दिवे व पंखे कुणी कॅबिनमध्ये नसताना सुरु असतात. अशा वेळी ते आवर्जून बंद केले तर वीज बचत होईल. गरज नसेल तर वातानुकूलित यंत्राचा वापर करू नये. आवश्यक तेथे पंख्यांचा वापर करावा. कारण वातानुकूलित यंत्रांना विजेच्या पंख्यांपेक्षा 6 पट वीज अधिक लागते. पाणी तापवण्यासाठ़ी गिझरऐवजी सौर ऊर्जेवरील संयंत्राचा वापर करावा. कुटुंबातील व्यक्तीच्या संख्येनुसार फ्रिजचा आकार ठरवला जावा. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर सर्वांनीच करावा. घरगुती विजेची उपकरणे ही प्रमाणित व वीजहानी कमी करणारी असावीत, अशी माहितीही या माहितीपटाद्वारे उपस्थितांपर्यंत देण्यात आली.
एकूणच वसुंधरेच्या संरक्षणासाठ़ी सर्वांनी दैनंदिन जीवनात नेमकेपणाने कार्यरत राहून पर्यावरणपूरक जीवनशैलीद्वारे सर्वांनी वागण्याविषयी आवाहन या चित्रफितीद्वारे महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे. आजच्या प्रदूषणाच्या काळात स्वच्छ व हरित ऊर्जा निर्मिती आणि संवर्धनासाठी महाऊर्जा विविध उपक्रमांद्वारे नेटाने कार्यरत आहे. सध्या देशभर सुरु असलेल्या (दिनांक 14 ते 20 डिसेंबर) ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने या ऊर्जा संवर्धन विषयक बोलक्या व लोकहितैषी अशा माध्यमातून जनमाणसापर्यंत वीज बचत व संवर्धनाची भूमिका नेमकेपणाने पोहोचवणारा हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील मान्यवर व पत्रकार तसेच महाऊर्जाचे महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, महाव्यवस्थापक हर्षल भास्करे, व्यवस्थापक विनोद सिरसाट, वाडोनकर, कुळकर्णी, श्रीमती कर्हे, धाबर्डे यासह नागपूर विभागातील विविध मान्यवर, महाऊर्जाचे अन्य अधिकारी व कर्मचारी आणि प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.