ShivSenaमुंबई

कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्थेला जो फटका बसला तो भारतीय बाजारामुळे भरून निघू नये – शिवसेना

चिनी अर्थव्यवस्थेचा 16 टक्के वाटा आमच्या बाजारपेठांनी व्यापला आहे व आम्ही इकडे ‘आत्मनिर्भर’ होण्याचे तुणतुणे वाजवीत आहोत.

मुंबई : कोरोनामुळे चीनी अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. अनेक कंपन्या चीनमधून काढता पाय घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच, आता भरातातही चीनी मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली आहे. काल पुण्याच्या ब्राम्हण संघटनेने चीनी मालाविरोधात आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचे शिवसेनेने स्वागत केले आहे. तसेच, विदेशी मालावर बहिष्कार टाकणारे पहिले भारतीय हे स्वातंत्र्यावीर सावरकर असल्याची आठवणदेखील शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करून दिेलेली आहे.

चीनी मलावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झालीव या चळवळीत कोणताही राजकीय पक्ष नसल्याचे सामनातून ठळकपणे सांगितले आहे. तसेच, पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. या संघटनेने आंदोलनासाठी जागा निवडली ती वीर सावरकर स्मारकाची हे महत्त्वाचे. परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच हिंदुस्थानी पुढारी होते. हा उल्लेख करण्यास सामना विसरले नाही. दरम्यान, कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्थेस फटका बसला तो हिंदुस्थानच्या बाजारामुळे भरून निघू नये. अशी इच्छा शिवसेनेने सामनातून व्यक्त केली आहे. तसेच चिनी अर्थव्यवस्थेचा 16 टक्के वाटा आमच्या बाजारपेठांनी व्यापला आहे व आम्ही इकडे ‘आत्मनिर्भर’ होण्याचे तुणतुणे वाजवीत आहोत. अशा शब्दांत केंद्र सरकारवर टीकादेखील केली आहे.

आजचा सामना –

चिनी मालावर बहिष्काराची चळवळ सुरू झाली तर त्याचे स्वागतच करायला हवे. या चळवळीत जनता स्वयंप्रेरणेने उतरली तर चीनला आर्थिक धक्का बसेल. पुन्हा ‘मेक इन इंडिया’सारख्या थंड पडलेल्या उपक्रमांना चालना मिळेल. जो माल चीनमधून येतो आहे तो महाराष्ट्रात येणे बंद झाले तर येथील उद्योग वाढेल व नवी उद्योग व्यवस्था निर्माण होईल.

पाकिस्तानवर केला तसा चीनवर सर्जिकल स्ट्राईक होईल की नाही ते माहीत नाही, पण जनतेने चिनी मालाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. स्वाभिमान व देशाभिमान देशाच्या मातीत आहे, तो तसाच राहील. त्यासाठी राजकारण्यांची गरज लागत नाही. लडाखच्या सीमेवर काय व्हायचे ते होईल, पण ‘स्वदेशी’ जनतेने चिनी मालावर ‘बहिष्कार बॉम्ब’ टाकला आहे!

चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात एक चळवळ सुरू झाली आहे. चीनच्या कुरापतींवर हा एकप्रकारे बॉम्बहल्लाच म्हणावा लागेल. त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नाही हे विशेष. पाकिस्तानपेक्षा चीन हाच आपला खरा शत्रू आहे. जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी हे सत्य सांगितले. मुलायम सिंग यादव हे काहीकाळ संरक्षणमंत्री होते. यादव चीन हाच पाकिस्तानचा खरा बाप असून चीन हाच आपला खरा शत्रू असल्याचे ठणकावले होते, ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले. राहुल गांधी यांनी काल पुन्हा एकदा सांगितले की, चीनने लडाखमध्ये घुसखोरी करून आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. सरकारने सत्य लपवू नये. चीनने लडाख, सिक्कीमच्या सीमेवर रणगाडे, क्षेपणास्त्रे व सैन्य आणून उभे केले आहे.

लष्करी हेलिकॉप्टर उडवून आमच्यावर दबाव आणला जात आहे. या सर्व परिस्थितीत सरकारकडून शांततेच्या चर्चा अत्यंत संयमाने सुरू आहेत, पण जनतेच्या मनातील राष्ट्रभक्ती उसळत आहे. जनतेच्या हातात बंदुका नाहीत. त्यामुळे त्यांनी चीनच्या मालावर बहिष्कार टाकून वेगळे युद्ध सुरू केले आहे. ठिकठिकाणच्या तशा बातम्या येत आहेत. पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. या संघटनेने आंदोलनासाठी जागा निवडली ती वीर सावरकर स्मारकाची हे महत्त्वाचे. परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच हिंदुस्थानी पुढारी होते. सन 1905 मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला होता. परदेशी मालाची होळी म्हणजे प्रखर देशभक्ती हा गुन्हा ठरवून वसतिगृहातून काढून टाकलेले सावरकर हे तेव्हा पहिले विद्यार्थी होते.

परदेशी मालाची होळी करण्याचे हेच आंदोलन 1921 साली गांधीजींनी केले. म्हणजे याबाबतीत तरी हिंदुत्ववादी व इतर यांचे एकमत होते. आज चीनच्या निमित्ताने जनतेने स्वत:च चिनी मालाची होळी करायचे ठरवले असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे. चीनने हिंदुस्थानात सरळ घुसखोरी केली आहे. त्यामुळे जनतेत चीनविरोधी लाट असून लोकांच्या राष्ट्रीय भावना शिगेला पोहोचल्या आहेत. देशातील अनेक व्यापारी संघटनांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. यावर मस्तवाल चीनने त्यांच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात म्हणजे ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये असे तारे तोडले की, ‘‘चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची हिंदुस्थानची हिंमतच नाही,’’ अशी आव्हानाची भाषा चीन देशाच्या सीमेवर आणि व्यापार उद्योगातही करत आहे. हिंदुस्थानच्या स्वाभिमान व देशाभिमानाला दिलेले हे आव्हान आहे. हिंदुस्थानी बाजारात चीनचा माल विकला जातो. त्यातून चीनची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे व त्याच मजबूत अर्थव्यवस्थेच्या तोफा हिंदुस्थानविरुद्ध सीमेवर उडवल्या जातात. कोरोनामुळे चिनी अर्थव्यवस्थेस फटका बसला तो हिंदुस्थानच्या बाजारामुळे भरून निघू नये. चिनी अर्थव्यवस्थेचा 16 टक्के वाटा आमच्या बाजारपेठांनी व्यापला आहे व आम्ही इकडे ‘आत्मनिर्भर’ होण्याचे तुणतुणे वाजवीत आहोत. दिवाळीत पणत्या, फटाके, मेणबत्त्या चीनमधून येतच असतात, पण आता लक्ष्मीच्या मूर्त्याही चीनमधून येऊ लागल्या आहेत. साधारण 3 हजार वस्तू चीनमधून आपल्याकडे येतात. हे सर्व थांबले तरच इथला व्यापार आत्मनिर्भर बनेल. चीनचा माल स्वस्त आहे, पण तो टाकाऊदेखील आहे.

चीनचा व्यापार जगभर पसरला आहे. 2017-18 मध्ये एकूण आयातीमध्ये चिनी मालाचे प्रमाण 18 टक्क्यांहून जास्त होते. याच काळात हिंदुस्थानात 68.8 अब्ज डॉलर्सचा चिनी माल आयात झाला. त्या तुलनेत केवळ 9.08 अब्ज डॉलर्सचा आपला माल चीनला पाठवला गेला. देशात ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर’सारख्या संघटना आहेत. त्यांनीही किराणा वगैरे दुकानांमध्ये चिनी माल ठेवणार नाही हे जाहीर केले, पण चिनी मालास पर्याय आहे काय? यावर मंथन होणे गरजेचे आहे म्हणूनच चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची हिंदुस्थानची हिंमत नसल्याची भाषा चिनी राज्यकर्ते करू शकतात. चिनी मालावर बहिष्काराची चळवळ सुरू झाली तर त्याचे स्वागतच करायला हवे. या चळवळीत जनता स्वयंप्रेरणेने उतरली तर चीनला आर्थिक धक्का बसेल. पुन्हा ‘मेक इन इंडिया’सारख्या थंड पडलेल्या उपक्रमांना चालना मिळेल. त्यातून लहान व मध्यम उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळेल. जो माल चीनमधून येतो आहे तो महाराष्ट्रात येणे बंद झाले तर येथील उद्योग वाढेल व नवी उद्योग व्यवस्था निर्माण होईल. चीनचे सैन्य लडाखच्या सीमेवर धडका मारत आहेत. पाकिस्तानवर केला तसा चीनवर सर्जिकल स्ट्राईक होईल की नाही ते माहीत नाही, पण जनतेने चिनी मालाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. स्वाभिमान व देशाभिमान देशाच्या मातीत आहे, तो तसाच राहील. त्यासाठी राजकारण्यांची गरज लागत नाही. लडाखच्या सीमेवर काय व्हायचे ते होईल, पण ‘स्वदेशी’ जनतेने चिनी मालावर ‘बहिष्कार बॉम्ब’ टाकला आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button