FeaturedMaharashtra Govकोल्हापूरकोल्हापूर महानगरपालिका

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे; मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

कोल्हापूर : सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत निधी वाटप हा सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कळीचा मुद्दा असतो. जिल्हा परिषदेचे राजकारण आतापर्यंत निधी वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरत होते. त्यापुढे जाऊन अध्यक्ष, सीईओ आणि कारभारी पदाधिकाऱ्यांवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील या सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी या आरोपातील तथ्य तपासून उलगडा करण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी गगनबावडा येथील खासगी शाळेच्या खोल्या स्वनिधीतून बांधल्या.

तसेच एका फार्महाऊसला जाण्यासाठी स्वनिधीतून रस्ता केल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी जाहीरपणे केला. वॉटर एटीएम घोटाळा झाल्याच्या संशयावरून राज्य शासनाने थेट समिती नेमून चौकशी केली. याचे पुढे काय झाले? वॉटर एटीएम निविदेत १० लाख रुपये घेणारा जिल्हा परिषदेतील पांडू कोण? असा सवाल राजवर्धन निंबाळकर यांनी केला. तब्बल चारपट पैसे देऊन ५०० रुपयांचे ऑक्सिमीटर दोन हजार रुपयांत खरेदी केले आहे. दोन हजारांचे थर्मल टेस्टिंग १० हजार रुपयांत घेतले. १४ रुपयांचा मास्क २०५ रुपयांना घेतला. या सर्व खरेदीची प्रक्रिया राबविताना पुणे आणि मुंबई येथे जाहिराती दिल्या. तेथीलच काही कंपन्यांना खरेदीची संधी दिली.

खरेदी केलेल्या कंपन्यांमध्ये राज्यातील काही मंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा आरोप अरुण इंगवले आणि विजय भोजे यांनी केला आहे. ३५ कोटी रुपयांच्या खरेदीचा तपशील जिल्हा परिषद लपवत असल्याच्या आरोपाने संशय वाढत आहे. आतापर्यंत ६० कोटी रुपये खर्च केले, मग ग्रामीण भागातील जनता बेड आणि व्हेंटिलेटर नाहीत, म्हणून मरणाच्या दारात का जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत भाजप आघाडीने जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button