‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली. पूरग्रस्तांना मदत करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर, सांगली, कराड भागात पूरपरिस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. या भागात ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. ऊसाला एका विशिष्ट उंचीपेक्षा जास्त पाणी आलं की या पिकाचं नुकसान होतं. काही ठिकाणी ऊसाच्या एकंदर उंची पेक्षा अधिक पाण्याची पातळी आल्याने नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/YyriJe4oR1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 8, 2019
राष्ट्रवादी एक महिन्याचा पगार देणार
दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. आमचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. ५० लाखांचा धनादेश आम्ही देणार आहोत, असं पवार म्हणाले. तसेच भारतातील औषध निर्मितीच्या संघटनेचे प्रमुख जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते औषध कंपन्यांशी संपर्क साधून पूरग्रस्तांना लागणाऱ्या औषधांचा पूरवठा करणार आहेत. आंबेजोगाईतील राष्ट्रवादीचे डॉ. काळे हे डॉक्टरांचं पथक पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
