AgriculturalFeaturedHealth & FitnessMaharashtra Govआरोग्यनाशिकमुंबई

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या

आरोग्य सुविधेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे. रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सूचना देताना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी आमदार आसिफ शेख, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

रमजान पर्वाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील व त्याबाहेरील प्रत्येक नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत. भाजीपाला, दूध व फळे यांचे नियोजन करतांना महानगरपालिकेमार्फत सुचविण्यात आलेल्या प्रभागातील दहा ठिकाणांपर्यंत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. प्रशासनाने देखील शासकीय चौकटीत न राहता मानवतावादी दृष्टीकोनातून नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध केल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील त्यांच्या सहकार्यांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधून अत्यावश्यक सेवा, सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे, असेही मंत्री श्री.भुसे म्हणाले.

प्राथमिक पातळीवरील कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो

मालेगाव शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात लक्षणे दिसून येत असली तरी उपचारासाठी ते पुढे येत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता पुढे यावे. प्राथमिक पातळीवरील रुग्ण हा लवकर बरा होतो. मालेगाव शहरातील पहिल्या टप्प्यातील काही बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट हाती येत आहेत. राज्यातील मयत रुग्णांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा वाढता आकडा हा दिलासादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मकता दाखवून कोरोनाला हरविण्यासाठी स्वत:हून पुढे यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी नागरिकांना केले आहे.

कायदा हातात घेवू नका; कारवाईला आमंत्रण देवू नका

मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे नागरिकांवर भितीचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन जिवाचे रान करुन अहोरात्र झटत आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अपेक्षित असतांना, त्यांच्यावर धावून जाणे, रुग्णालयात तोडफोड करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाला बंधिस्त रहावे लागत असतांना त्याला 97 टक्के नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही मुठभर लोकांकडून असे बेकायदेशीर प्रकार होत आहेत, ते बरोबर नाही. आणि कुणी जाणून बुजून असे प्रकार करुन कायदा होतात घेत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button