अजित पवार यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लालपरी ठप्प आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मागील चार महिन्यांपासून एसटीतील कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे दोन हजार ते अडीच हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. टाळेबंदीत एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे. एसटीला आर्थिक मदत करावी अशी मागणी महामंडळाबरोबरच विविध कामगार संघटनांनीही केली आहे. एसटीतील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

