पुणे: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते आज बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील.
आज फडणवीस कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसऱ्या दिवशी, दि. २० रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना भेट देतील. तर २१ तारखेला हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत. या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ही सहभागी असणार आहेत. या दोन नेत्यांच्या टेंभुर्णी संयुक्त दौऱ्यानंतर फडणवीस करमाळा परांड्या कडे रवाना होतील तर दरेकर पंढरपूर येथे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यारा करतील.
