शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे – मुख्यमंत्री
मुंबई: केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पंजाब, हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्याने भाजपचा जुना मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्याबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक पार पडली.
शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही पण या कायद्यांचे आंधळे समर्थन करायचे नसून कायद्यातील त्रुटी, उणीव दूर करणे महत्वाचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन व शेतकऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा होणे गरजेचे होते. विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही पण या अगोदरच्या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीतल्या अनुभवांची देवाणघेवाण होणे गरजेचे होते असं सांगत त्यांनी कृषी विधेयकावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.