Sportsक्रिकेटक्रीडा

इंग्लंडला दाखवली फिरकीची जादू; कसोटीवर भारताची मजबूत पकड

चेन्नई: रविचंद्रन अश्विन भारताचा हा फिरकी गोलंदाज गेल्या कसोटीत डावाच्या पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट काढणारा जगातील एकमेव फिरकी गोलंदाज ठरला होता. आता कसोटी सामन्यांमध्ये २०० डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. ज्यांच्या नावावर सर्वाधिक कसोटी बळी आहेत त्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांनासुद्धा हा विक्रम जमलेला नाही.

विशेष म्हणजे अश्विनने आपल्या कारकिर्दीत ज्या फलंदाजांना सर्वाधिक वेळा बाद केले आहे ते सर्वच्या सर्व डावखुरे आहेत. यात डेव्हिड वाॕर्नर (१० वेळा), अॕलिस्टर कूक (९ वेळा), बेन स्टोक्स (९ वेळा), एड कोवन (७ वेळा) आणि जेम्स अँडरसन (७ वेळा) यांचा समावेश आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. भारताच्या पहिल्या डावात ३२९ धावांच्या बदल्यात इंग्लंडला फक्त १३४ धावा करता आल्या. पहिल्या डावात १९५ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर भारताने १ बाद ५४ धावा केल्या होत्या. भारताकडे एकूण आघाडी २४९ धावांची आहे. दुसऱ्या दिवशी एकूण १५ विकेट पडल्या. यात भारताच्या ५ तर इंग्लंडच्या १० विकेट होत्या.

दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव ३२९ धावा संपुष्ठात आणला. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरूवात झाली. इशांत शर्माने रॉरी बर्न्सला पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विने आठव्या ओव्हरमध्ये सिबलीला १६ धावांवर माघारी पाठवले. इंग्लंडची अवस्था २ बाद १६ होती तेव्हा कर्णधार जो रूट मैदानावर आला. रूट इंग्लंडला सावरेल असे वाटत होते. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. पण भारताकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट रूटची मिळवली. पटेलने रूटला ६ वर बाद केले त्यानंतर अश्विने लॉरेंन्सला बाद करून इंग्लंडला चौथा धक्का दिला. ५२ धावसंख्येवर अश्विनने बेन स्टोक्सला बाद करून इंग्लंडला पाचवा धक्का दिला.

यानंतर ओली पोप आणि विकेटकिपर फोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी काही धावा जोडल्या. पण सिराजने त्याच्या पहिल्याच चेंडूवर पोपला बाद केले. विकेटकिपर ऋषभ पंतने त्याचा शानदार कॅच धरला. अक्षरने धोकादायक मोइन अलीला ६ धावांवर माघारी पाठवले. इंग्लंडच्या तळातील अखेरच्या ३ पैकी दोन विकेट अश्विनने घेतल्या. तर इशानने एक विकेट घेतली. भारताकडून अश्विने सर्वाधिक ५, इशांत, अक्षर यांनी प्रत्येकी दोन तर सिराजने एक विकेट घेतली. कुलदीप यादवला एकही विकेट मिळवता आली नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button