मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे आदेश
रत्नागिरी: मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अत्यावश्यक असताना मान्यतेअभावी रखडल्याचे पाहुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ते तातडीने हाती घेण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी मिश्रा यांना दिले आहेत.
मिऱ्या बंधाऱ्याची झीज होणे मिऱ्या गावासाठी धोकादायक ठरत आहे. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा 6 ठिकाणी धोकादायक बनला आहे. या ठिकाणांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी 98 लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले मात्र प्रशासकीय मान्यतेअभावी दुरुस्तीचे काम रखडले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून या अंदाजपत्रकाला तातडीने प्रशासकीय मंजुरी द्या, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी मिश्रा यांना दिल्या आहेत. या बंधार्याच्या दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी जानेवारी 2020 मध्ये पतन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले. या बंधार्यामुळे दुरूस्तीसाठी 98 लाख रुपयांची गरज असल्याचे पत्रानुसार दिसून आले.
त्यानंतर मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली मात्र अद्यापही या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. त्यांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र जोपर्यंत समिती बैठक होत नाही. तोपर्यंत प्रस्तावास मंजूरी देता येणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकार्यांनी सांगितले, असे पतन विभागाने दिलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले. बंधार्याची झीज गावासाठी धोकादायक ठरत आहे.
गावातील लोक स्वतःचा जीव मुठीत धरून राहात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी ही बाब विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या समोर मांडली. ना. दरेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार चवंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत ना. दरेकर यांच्याकडे पाठवली. या निवेदनावर तातडीने निर्णय घेताना मिऱ्या बंधारा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना ना दरेकर यांनी केली आहे. दुरूस्ती न केल्यास मिऱ्या येथील ग्रामस्थांचे जीवन धोक्यात येऊ शकते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून या बंधाऱ्याच्या 98 लाखाच्या अंदाजपत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी सूचना ना. दरेकर यांनी प्रशासनाला केली आहे.