नुकसानग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोंकणच्या समुद्र किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली होती. आणि रायगड जिल्ह्याला तात्काळ १०० कोटीची मदत जाहीर केली होती. त्याच प्रमाणे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसराचा दौरा करून,नुकसानीचा आढावा घेतला.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ काँफरन्स घेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ कोटी रूपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी रूपये तात्काळ मदत जाहीर केली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले. या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत, एकनाथ शिंदे , उदय सामंत, अनिल परब, दादा भुसे आणि सर्व जिल्हाधिकारी आणि आमदार योगेश कदम,आमदार वैभव नाईक ,सर्व लोकप्रतिनिधी यांचे समवेत संवाद साधला.
अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.