अखेर १६ तासांनंतर लोकल सेवा पूर्वपदावर
मुंबई : मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये गेले तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण अखेर १६ तासांनी मध्य मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे ठाणे ते सीएसएमटी सेवा पुर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. संतत धार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने दोन्ही मार्गावरील सेवा मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. काही प्रवासी तर रात्रीपासून स्थानकांवर अडकून पडले होते. पावसाच्या तडाख्यामुळे १६ तासांपासून ठप्प असलेली मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा अखेर पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेने ट्विटर पेजच्या माध्यमातून दिली.

