मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुक्काम केला असल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून रेल्वे सेवापासून ते रस्ते वाहतूक देखील ठप्प झाली असता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी तुंबले नसल्याचा दावा माध्यमांसमोर केला.
महापौर महाडेश्वर यांना मुंबईत तुंबलेलं पाणी आणि लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. मुंबईतील कित्येक भागात पाणी तुंबले असताना महाडेश्वर म्हणतात की, मुंबईमध्ये कुठेच पाणी तुंबलेले नाही. त्यामुळे त्यांना कदाचित दिसण्याची समस्या असावी, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौरांसाठी जाड भिंगाचा चष्मा कुरिअरने पाठवण्यात येत आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस आणि मुंबई महापालिकेतील मनसेचे माजी गटनेते संदीप देशपांडे यांनी ट्विटवर व्हिडिओ अपलोड करून दिली. तसेच मुंबई पालिकेतील आणखी सत्ताधारी नेत्यांना जाड भिंगांचा चष्मा कुरिअरने पाठवणार असल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये नमूद केले.

