Maharashtra GovNCPShivSena-Congress-NCPVidhan Bhavanअधिवेशनराजकारणविधानसभा

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार

नागपूर (विशेष प्रतिनिधी)ः सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारच्यास्तरावर सर्व बाजूंनी माहिती घेतली जात आहे. स्वतः शरद पवार यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा सुद्धा अभ्यास सुरु आहे. त्यासाठी काही कालावधी लागणार असला तरी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया कमीत कमी कालावधीत म्हणजेच दोन ते तीन महिन्यात पूर्ण करतानाच साधारण येत्या खरीपापूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिले. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याची सुद्धा चाचपणी सुरु असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकारच्यापातळीवर चर्चा सुरु आहे. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असतानाच्या काळात देशात मोठी कर्जमाफी करण्यात आली होती. शरद पवार स्वतः याबाबतीत मार्गदर्शन करीत आहेत. वित्तमंत्री जयंत पाटील ही माहिती घेत आहेत. शेजारील राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातही कर्जमाफी झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला त्याची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. वित्त, सहकार आणि कृषी विभागाकडून आवश्यक ती माहिती संकलित केली जात आहे. त्याअनुषंगाने सगळीकडून माहिती घेतली जात आहे.
प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, ही शासनाची मानसिकता आहे. त्यासोबतच या योजनेत पारदर्शकता राहावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याचीही दक्षता घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार सुरु आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. कर्जमाफीचा निर्णय कधी होणार, किती कर्जमाफी होणार हे आता सांगता येणार नसले तरी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे, त्यात अजिबात शंका नाही. ही कर्जमाफी दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याच्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न राहतील, त्यासाठी तीन वर्षे लागणार नाहीत, असा टोलाही त्यांनी तत्कालिन फडणवीस सरकारला लगावला. तसेच येत्या खरीपापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्यास त्यांना नव्या हंगामाला सामोरे जाता येईल, असेही संकेत त्यांनी दिले आहेत. योग्य आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत कर्जमाफीचे लाभ पोहोचावेत यासाठी त्यांना आधारलिंक करावे का याचीही चाचपणी केली जात आहे.
तसेच कर्जमाफीसाठी किती निधी लागणार आहे, त्याचा किती आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल, तिजोरीला किती भार पेलणे शक्य आहे, याचाही विचार सुरु आहे. कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही. एका राज्याला अशी मदत केली तर देशातील इतरही राज्यांना मदत करावी लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा संपूर्ण बोजा राज्याच्या तिजोरीवरच पडणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनानंतर दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळात ४३ मंत्रीपदे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे वाटप निश्चित झालेले आहे. पक्षनिहाय खातेवाटपही निश्चित झालेले आहे. सध्या जी जी खाती ज्या पक्षाच्या मंत्र्यांकडे आहेत, यात थोडाफार बदल होऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच प्रत्येक पक्षाच्या राज्यमंत्र्यांकडे संमिश्र खातेवाटप असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी यावेळी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचेही तोंडभरुन कौतुक केले आहे. आदित्य नवखा आहे. सगळ्यांमध्ये मिसळतो. काय करता येईल हे सभागृहात पाहतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही. अहंकार दिसत नाही, हे कौतुकास्पद आहे, असेही अजित पवार म्हणाले. मिटिंग असली आणि कोणीही सीनिअर आले तर आदित्य लगेच खुर्ची खाली करुन देतो, मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असे त्याचे वागणे दिसत नाही, अहंकार नाही, असेही अजित पवारांनी नमूद केले.
याशिवाय अजित पवारांनी काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचेही कौतुक केले. धीरज बोलताना तर मला क्षणभर विलासराव देशमुखच बोलत आहेत का असे वाटले, त्याची बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासराव यांच्यासारखीच वाटत होती, असे अजित पवार म्हणाले. आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगले काम करत आहे, असे म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचे कौतुक केले. विद्यमान विधानसभेत सुमारे शंभरभर युवा, नवे आमदार आहेत.

अजित पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार कसे आकाराला आले याचीही माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button