‘दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’
असे म्हणणारे मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत
मुंबई : भारत – चीन सीमेवरील तणाव वाढून हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. त्यात एक कर्नल अधिकारीही आहेत. नुसत्या झटापटीत भारताला 20 जवान गमवावे लागले आणि पंतप्रधान मोदी याबाबत बोलायला तयार नाहीत म्हणून विरोधक आणि देशातील जनता संतापली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
हिंदुस्थान-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षांनंतर सुरू झाल्या व 20 जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत हे धक्कादायक आहे. असे सामनातून म्हटले आहे. तसेच, ‘दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’ असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे म्हणणारे मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश असल्याचा टोलाही सामनातून लगावला आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते.
अमेरिका चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही. आपला देश येतो व चीन आपले सीमेवरील शेजारी राष्ट्र आहे हे विसरता येत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. अशी आठवणही शिवसेनेने सामनातून करून दिली आहे.
अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे दिल्लीत बैठका आणि चर्चासुरूआहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण20 जवानांचेबलिदानवायाजाऊद्यायचेकाय? प्रतिकारझालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल.
हिंदुस्थान व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी युद्ध झाले. हे युद्ध रक्तरंजित आहे. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाल्याचे वृत्त संतापजनक आहे, पण हे युद्ध नसून दोन देशांच्या सैन्यांत हाणामारी झाली असे सांगण्यात येत आहे. पण हाणामारीत आमचे वीस जवान मारले जातात. चीनच्या बाजूचे चाळीसेक जवान मारले गेले असल्याचे वृत्त येते म्हणजे दोन देश सीमेवर मिळेल त्या हत्याराने लढत आहेत. डोकी फोडत आहेत. कोथळे काढत आहेत. सीमेवर रक्ताचे सडे पडत आहेत. हिंदुस्थान-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षांनंतर सुरू झाल्या व 20 जवानांच्या हौतात्म्यानंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत हे धक्कादायक आहे. पूर्व लडाखच्या गलवान व्हॅली सीमेवर सोमवारी रात्री चीन आणि हिंदुस्थानच्या सीमेवर ही दंगल झाली आणि त्यात आपले 20 जवान शहीद झाल्याचे अधिकृतपणे सांगायला बुधवार उजाडावा लागला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. आम्हाला डिवचलं तर जशास तसं उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत’, असा इशारा चीनला दिला. ते योग्यच झाले. तरीही गलवान खोर्यात नक्की काय झाले, चीन सीमेवर नेमके काय घडत आहे हे अद्याप जनतेला सांगण्यात आलेले नाही. ‘सूत्रं’ सांगतात की, चीनचे कमांडिंग ऑफिसर व त्याचे 30-40 सैनिकही या झटापटीत मारले गेले. आता चीनचे सैनिकही मारले गेले यावर खूश होऊनच आपण टाळ्या वाजवायच्या काय? चीनचेही नुकसान झाले हे मान्य, पण हिंदुस्थानच्या हद्दीत चिनी सैन्य घुसले आहे.
चीनने हिंदुत्वाच्या सार्वभौमत्वावर हा घाला घातला आहे. याआधी 1975 मध्ये चिनी सैन्य आपल्या अरुणाचल प्रदेशात घुसले होते व त्यांनी गोळीबार केला होता. त्यात चार हिंदुस्थानी सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर ही आता सगळ्यात भयंकर दंगल सीमेवर झाली आहे. कोणतेही हत्यार, बंदुका, क्षेपणास्त्र, रणगाडे न चालवता दोन्ही बाजूंनी इतकी प्रचंड सैन्यहानी होत असेल तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला? आपण अश्मयुगातील दगड-धोंड्यांच्या लढाईत एकमेकांचे जीव घेत आहोत. लडाखच्या सीमेवर तरी तेच दिसले आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते. नेपाळने हिंदुस्थानचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणार्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल.
ट्रम्प व चीन यांचे भांडण कोरोनाच्या प्रसारावरून लागले, पण अमेरिका चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही. आपला देश येतो व चीन आपले सीमेवरील शेजारी राष्ट्र आहे हे विसरता येत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे.
‘गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’, असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल. चीनचे पंतप्रधान अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळा खात बसले तेव्हाही याच स्तंभातून आम्ही इशारा दिलाच होता. “चिनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नका! पंडित नेहरूंचा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल.” दुर्दैवाने तो झाला आहे. पाकिस्तानला दम देणे, धमक्या आणि इशारे देणे, सर्जिकल स्ट्राइक करून राजकीय माहोल बनवणे सोपे आहे; कारण पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे, पण चीनचे तसे नाही.
अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल.

