मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढताना दिसणार आहेत. शिवसेना ४०-५० जागांवर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर चर्चा केली होती . आम्ही केवळ ४ ते ५ जागा मागितल्या, पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, राजद नेते तेजस्वी यादव यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. बिहारमध्ये भाजप, जेडीयू यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र ते झालं नाही. त्यामुळे बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत, शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
