Omraje Nimbalkar : धाराशिवमध्ये ‘भाऊ विरुद्ध भाऊ’! ओमराजेंच्या बंडानंतर मकरंदराजेंची ठाकरेंना साथ
Omraje Nimbalkar : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उबाठा पक्षातून फुटलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ओमराजेंनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे धाराशिवच्या राजकरणाला नवे वळण लागले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयाला आता घरातूनच विरोध झाला आहे. ओमराजेंचे चुलत बंधू आणि उबाठा गटाचे सहसंपर्कप्रमुख मकरंदराजे निबांळकर यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याच निर्णय घेतला आहे. याशिवाय ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.
महिन्याभरापासून बंडाची तयारी
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराची चर्चा गेल्या महिन्याभरापासूनच सुरू होती. असा दावा मकरंदराजे निंबाळकर यांनी केला आहे. याबद्दल ओमराजे यांच्यासोबत स्वत: चर्चा केल्याचे मकरंदराजे यांनी म्हटले आहे. पण उबाठा सोडण्याचा ओमराजेंचा निर्णय मला मान्य नव्हता असे मकरंदराजे यांनी स्पष्ट केले. वर्ष 2029 मध्ये विजयी होऊ असे समजावून सांगण्याचा प्रयत्न ओमराजेंना केला गेला. पण त्यांनी आपला निर्णय कायम ठेवल्याचे मकरंदराजे यांनी म्हटले.
पक्षाचा आदेश मिळाला तर विरोधातही उतरणार
गेली दहा वर्षे एकत्र राजकारण करणारे दोन्ही भाऊ आता वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ठाकल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या विचारांनुसार व्यवस्थेला जाब विचारून काम करणे अपेक्षित असते. पण अमकरंदराजे यांनी पक्षाचा आदेश मिळाल्यास ओमराजे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंची धाराशिव दौऱ्याची तयारी
उद्धव ठाकरे लवकरच धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याची तयारी देखील सुरू झाली आहे. यावेळी संघटनात्मक बांधणीवर अधिक भर दिला जाणार असल्याचे मकरंदराजे यांनी म्हटले. ओमराजेंनी पक्ष सोडला असला तरीही शिवसैनिकांची ताकद आणि जनाधार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल असा विश्वास मकरंदराजे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये ‘भाऊ विरुद्ध भाऊ’ अशी राजकीय लढत रंगण्याची चिन्हे दिसून येऊ लागली आहेत.
अर्चना पाटील यांचे स्वागत
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी, महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास ओमराजे यांच्या प्रचारासाठीही तयार असल्याचे सांगितले. ‘बसमध्ये सीट मिळवून देणे किंवा लहान-मोठी कामे करणे म्हणजे विकास नव्हे,’ असा टोला लगावत त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सलही व्यक्त केली. विकासाच्या उद्देशाने ओमराजे महायुतीत आले असतील, तर त्यांना पूर्ण सहकार्य असेल, असेही अर्चना पाटील यांनी म्हटले.



