पूरपरिस्थितीत कुर्लावासियांच्या मदतीसाठी नौदलाच्या जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन
कुर्ला : मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. कुर्ला येथे काही भागात रस्ते पाण्याखाली गेलेच आहेत. पण त्याचबरोबर दुकाने आणि घरांमध्ये कमरेइतके पाणी भरल्याने रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. मुसळधार पावसाने घरे आणि दुकानात शिरलेलं पाणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने येथील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे पालिकेने नौदलाच्या आयएनएस तानाजी आणि एनडीएफच्या टीमला कुर्ल्यात बोलवले असून या दोन्ही पथकाने लाइफ जॅकेट आणि बोटीच्या साहय्याने एक हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश जास्त आहे. या दोन्ही पथकांनी रहिवाश्यांबरोबरच त्यांच्या मोटरसायकल, घरातील महत्त्वाच्या वस्तूही सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. अजूनही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असून दोन्ही पथके आज कुर्ला भागात मदतकार्य सुरु ठेवणार आहेत.

