नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
सरकारकडून २२९७ कोटी वितरित करण्याचा आदेश काढला
नागपूर: सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी २२९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते.
आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, त्यापैकी आज 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असं मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली आहे.
मात्र, आम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मागून ही मदत देत आहोत. काल काही बातम्यांमध्ये विदर्भाच्या वाट्याला अवघे 8 कोटी असा उल्लेख होता, त्यात तथ्य नाही. उलट विदर्भाला 566 कोटींचा निधी देणार आहोत, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात एकूण 4 हजार 700 कोटी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून १० हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 9, 2020