महिलांसाठी लोकल सुरु करण्याची तयारी होती, महाराष्ट्राचे पत्र आज मिळाले – पीयूष गोयल
मुंबई: घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा करत आहे. नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का? रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.
अखेर मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या मागणीला रेल्वेने परवानगी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आणि सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
“मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत”, असे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे.
मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020
महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले आहे. नवरात्रीच्या एक दिवसाआधी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांची आता प्रवासाचा पेच सुटला असे वाटत असतानाच रेल्वेने परवानगी नाकारल्याने हिरमोड झाला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र पाठवले.
महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार महिलांसाठी लोकल सुरु करायला आम्ही त्वरित परवानगी देत आहोत, असे सांगताना गोयल म्हणालेत – महिलांसाठी लोकल सुरु करायची रेल्वेची नेहमीच तयारी होती. आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत. महिलांच्या लोकल प्रवासांच्या विलंबाचा चेंडू रेल्वेमंत्र्यांनी ठाकरे सरकारकडे टोलवला.

