Agriculturalकोल्हापूर

फडणवीसांची साखरपेरणी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला बोचणारी

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना सोबत घेऊन केंद्राकडे अडचणी मांडल्या. साखर कारखानदारी बाबत नेमलेल्या मंत्रीसमितीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांच्याशी थेट फडणवीस यांनी शिष्टमंडळासह चर्चा केली, यातून साखर कारखानदारी संबंधित अनेक प्रश्न येत्या काही महिन्यात सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

देशातील साखर उद्योगांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 22 हजार कोटी एफआरपी थकीत आहे. ऊस वाहतूक, तोडणी, कामगार पगार, व्यापारी देणी प्रलंबित आहेत. कर्जाचा मोठा बोजा असल्याने व्याज व हप्ते याची चिंता निर्माण झाली आहे. या बाबी गंभीर असल्याने साखर उद्योगाला केंद्र शासनाकडून आणखी एखादे पॅकेज मिळवण्याच्या उद्देशाने फडणवीस यांनी दिल्ली वारी केली. या शिष्टमंडळात वारणा कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री विनय कोरे, भिमा साखर कारखान्याचे चेअरमन कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा प्रामुख्याने समावेश होता. साखर कारखानदार यांना सोबत घेऊन फडणवीस यांनी केंद्र सरकार सोबत प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून मात्र फडणवीस यांच्या या कृतीला राजकीय आयाम दिला जात आहे.

फडणवीस यांनी भाजपने इन्कमिंग केलेल्या साखर कारखानदारांना सोबत घेऊन प्रश्न सोडवावेत त्यांचे जाहीर आभार मानतो, अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी जलद कृती करत आहेत. यामुळे ऊस पट्ट्यातील आपली पकड ढिली होईल, अशी भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना सतावत आहे. या भीतीपोटीच मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठवली जात असल्याची चर्चा आहे.

साखर उद्योगातील आर्थिक प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने नोंद घेण्याची गरज असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जाते. भाजपच्या साखर महाराष्ट्रातील साखर उद्योग विभाग आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, यंदा उसाचे विक्रमी उत्पन्न झाले असल्याने गाळपाचे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. आर्थिक पातळीवर अडचणीत असलेल्या साखर उद्योगाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. राजकारणाच्या पलीकडे त्याचा विचार झाला पाहिजे, ही भावना घेऊनच फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. शरद पवार असे प्रयत्न करीत असतात, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले तर त्यात गैर काही नाही, अशी प्रतिक्रिया पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे महाडिक यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यात राजकारणाच्या फळात साखर कारखानदारी हा कळीचा मुद्दा ठरतो. येथील साखर कारखानदारीवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे कारखानदारीचे प्रश्न सुटल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होणार असल्यानेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही गटात मोठी अस्वस्थता दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button