Maharashtra GovPoliticsकोल्हापूर

मराठा आरक्षणावर राजकारण नको : खा. संभाजीराजे

कोल्हापूर :- मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असा सल्ला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला.

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारनं हा खटला पाच न्यायमूर्तींच्या खंठपीठाकडे देण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीवर २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावे, सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांनासुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, असे संभाजीराजे म्हणाले. फेसबुक अकाउंटवरून संभाजीराजे यांनी मत व्यक्त केले. मराठा समाजाने प्रचंड त्यागातून आतापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

याबाबत केंद्र शासनानेसुद्धा सहकार्य करावे. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाची सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेऊ नये आणि हा मुद्दा पाच न्यायाधीशांच्या सांविधानिक पीठाकडे पाठवावा अशी समाजाची आणि माझीसुद्धा सुरुवातीपासून मागणी आहे. त्याकरिता न्यायालय २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. त्यावेळी शासनाने जोरदार मोर्चेबांधणी करणे आवश्यक आहे. पुढील सुनावणीवेळी समाजाची बाजू भक्कमपणे मांडली जाईल, असा विश्वासही खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button