Policeमुंबई

मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू; डिस्चार्ज मिळून झाले होते चार तास

गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण संख्या २,३२५ वर

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना पोलीस प्रशासनाला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. वरळीतील कोरोनाग्रस्त पोलीस कॉन्स्टेबलला १० दिवसांनी कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज दिल्याच्या अवघ्या ४ तासांनीच या कॉन्सेटबलचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

वांद्रे पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले हवालदार दीपक हाटे यांचा शुक्रवारी करोनाने मृत्यू झाला. दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार घेतल्यानंतर हाटे यांना घरी सोडण्यात आले होते. घरी परतल्यानंतर चार तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील मृतांची संख्या १६ झाली आहे.

हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. १८ मे ला त्यांची प्रकृती खालावली. करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल केले गेले. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल एका पोलिसाने कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितात पोलिसांची संख्या आता २ हजार ३२५ इतकी झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य प्रशासनासह महाराष्ट्र पोलीस दल देखील दिवस रात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पोलिसांनाही होत असून ही संख्या आता वाढत चालली आहे.

राज्यातील लॉकडाउन सुरू झाल्यापासून पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. लॉकडाउन काळात नागरिकांना सतर्क करणं, त्यांच्या मदतीस धावून जाणाऱ्या पोलिसांचा दिलदारपणा आपण पाहत आहोत. मात्र नागरिकांना संरक्षण देताना पोलीस दलावरचा आता कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची ही संख्या आटोक्यात आणण्याची गरज आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत २६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ९७० पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button