नवभारतीय शिव वाहतूक संघटना व खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या पुढाकाराने समस्यांवर मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार सकारात्मक; अन्यायकारक कारवायांवर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन

मुंबई:
महाराष्ट्रातील खाटीक समाज, मटण व्यापारी तसेच शेळी-मेंढी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची होत असलेली विनाकारण अडवणूक, खोटे गुन्हे दाखल करणे, रस्त्यावरील छळ आणि कायद्याच्या गैरवापरातून होणारा मानसिक व आर्थिक त्रास या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नवभारतीय शिव वाहतूक संघटना व खाटीक समाजाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते हाजी अरफात शेख यांनी मा. मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारजी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
हाजी अरफात शेख यांनी मांडल्या समस्या
या भेटीदरम्यान नवभारतीय शिव वाहतूक संघटना व खाटीक समाजाचे अध्यक्ष या नात्याने हाजी अरफात शेख यांनी समाजासमोरील व वाहतूकदारांसमोरील सर्व प्रमुख प्रश्न आणि अडचणी आदरणीय मंत्र्यांसमोर अत्यंत गांभीर्याने मांडल्या. निरपराध व्यापारी व शेळी-मेंढी वाहतूकदारांना त्वरित न्याय मिळावा, त्यांचा पारंपरिक व्यवसाय व वाहतूक निर्भय वातावरणात सुरू राहावी आणि अशा अन्यायकारक कारवायांना तात्काळ आळा घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रभावी उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
प्रशासनाशी समन्वय साधून योग्य तोडगा काढू — ॲड. आशिष शेलार
हाजी अरफात शेख यांचे म्हणणे अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर मा. आशिष शेलारजी यांनी संबंधित सर्व यंत्रणांशी तातडीने समन्वय साधून या विषयावर लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, कोणत्याही पुराव्याशिवाय विनाकारण त्रास देणाऱ्या व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि खाटीक समाज व वाहतूकदारांना पूर्ण न्याय मिळवून दिला जाईल, असा सकारात्मक विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खाटीक समाजाच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे, व्यापाऱ्यांच्या व वाहतूकदारांच्या सन्मानाची जपणूक करणे आणि त्यांचा व्यवसाय सुरक्षित ठेवणे यासाठी हाजी अरफात शेख व नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा हा लढा पुढेही तितक्याच ठामपणे सुरू राहील, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
(विशेष बातमी प्रतिनिधी)



