कोंकणातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी विशेष निधी द्या; खासदार रविंद्र वायकर यांची लोकसभेत मागणी

कोंकणातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात तसेच नवीन सब-स्टेशन्स उभारण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अंतर्गत निवेदनाद्वारे केली. हे निवेदन लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आले असून, या विषयाकडे ऊर्जा मंत्र्यांचेही लक्ष वेधत प्रकल्पासाठी तातडीने विशेष निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित
निवेदनात खासदार वायकर यांनी नमूद केले की, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे कोंकणात दरवर्षी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. झाडे कोसळून वीजवाहिन्यांचे नुकसान होण्याच्या घटना सातत्याने घडत असून, अनेकदा दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण गावांचा वीजपुरवठा तासन्तास बंद ठेवावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योगांना फटका
वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईल टॉवर्सचे बॅकअप संपून दूरसंचार सेवा ठप्प होते. इंटरनेट सेवा बंद पडल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच लहान व्यापारी, शेतकरी आणि कुटीर उद्योगांचे कामकाजही विस्कळीत होत असून, या परिस्थितीचा कोंकणच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भूमिगत वीजवाहिन्यांवर भर
कोंकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, वीजवाहिन्या भूमिगत करणे हाच दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय असल्याचे वायकर यांनी सांगितले. यासाठी आवश्यक विशेष निधी तातडीने मंजूर करून नवीन सब-स्टेशन्स उभारावीत, जेणेकरून कोंकणातील नागरिकांना अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली.
ऊर्जा मंत्रालयाकडे विशेष निधीची मागणी
लोकसभा नियम ३७७ अंतर्गत मांडलेल्या या निवेदनाद्वारे खासदार वायकर यांनी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने कोंकणातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी आणि प्रकल्पाला प्राधान्याने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.



