आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीने पटकावला ग्रँडमास्टर नॉर्म
इंडोनिशियात झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारी हीने ११ फेऱ्यांमध्ये ७ गुण पटकावून महिला ग्रँडमास्टर (WGM) हा नॉर्म मिळवला. ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी तीन नॉर्म गरजेचे असतात. ऋचा पुजारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या मान्यतेने व इंडोनेशियन चेस फेडरशनेच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत फ्रान्स, जॉर्जिया, भारत, रोमानिया, सिंगापूर व व्हिएतनाम या प्रत्येक देशातून एक व इंडोनेशियातील सहा अशा १२ खेळाडूंना आमंत्रित केले होते. भारतातून मात्र एकमेव ऋचा पुजारीला आमंत्रित केले होते. इंडोनेशियातील योगर्टा या शहरातील ग्रँड इन्ना मॅलिओनेरो या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा झाली. महिला ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी नऊ फेऱ्यांमध्ये कमीत कमी ६.५ गुण होणे गरजेचे असते. तसेच आपला रेटींग परफॉर्मन्स २४०० च्या पुढे असावा लागतो. ऋचाने आठव्या फेरीतच ६.५ गुणांची कमाई करत महिला ग्रँडमास्टरच्या पहिल्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले. पुढील महिन्यात चीन आणि ऑगस्ट महिन्यात अबुदाबी येथे ग्रँडमास्टर्स स्पर्धेत ती आता सहभागी होणार आहे.
